आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांची घणाघाती टीका
पेण, दि. १३ - एका विशिष्ट वर्गासाठी शासनकर्ते काहीही करायला सिध्द होत आहेत. अगदी त्यांच्यासाठी आकाश-पाताळ एक करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र दुसरीकडे दुर्बल, वंचित, बहुजन समाज घटकांची साधी दखलही घेण्याची त्यांना उपरती होत नाही. या वर्गाला आघाडी सरकारमध्ये खिजगणतीतही स्थान नाही. त्यामुळ्ये राज्यातले सरकार हे रयतेचे सरकार आहे की एका विशिष्ट वर्गाचे आहे. अशी भावना सर्वसामांन्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. कारण आगरी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि जीवनमरणाच्या प्रश्नांसाठी सहा महिन्यापासून शासनप्रमुखांच्या भेटीची प्रतीक्षा करीत आहोत, परंतु आतापर्यंत जराही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून हे सरकार बोलायला तयार नाही. ऐकायलाही तयार नाही आणि समाजाच्या दुःख-वेदनांकडे बघायलाही तयार नाही. त्यामुळ्ये हे सरकार अंधळये, बहिरे आणि मुके सरकार आहे. अशी घणाघाती टीका अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्ये राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केली आहे.
यावरून आगरी समाज हा नगण्य असल्याची काहीशी भावना राज्यकर्त्यांची झालेली दिसत आहे. यातूनच मागील सरकारात १० व आता ११ आमदार आगरी जातीचे निवडून आले असतानाही यापैकी एकालाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले गेले नाही. अशी खंत व्यक्त करतानाच राज्यात आगरी समाज बिलकुल नगण्य नाही. खातरजमाचं करून घ्यायची असले तर येत्या जनगणनेत आगरी जातीची स्वतंत्र जनगणना करून पाहावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आंदोलनाची जुनी पार्श्वभूमी असलेला शूर, वीर, लढवय्य असा आगरी समाज आतापर्यंत खूप काही सहन करत आलाय. आता त्याच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागलाय. जेव्हा रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अशा अनेक जिह्ल्यातून कोटींच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरेल तेव्हा शासनकर्त्यांना समाजाची खरी ताकद कळेल. असा इशाराही सूर्यकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.