कमाई थांबली खरी पण खर्चातही झाली घट
पेण, दि.१५- साऱ्या जगात हाहाकार उडविणाऱ्या आणि माणसा-माणसात दहशत माजविणाऱ्या कोविद-१९ च्या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात २२ मार्च २०२० पासून आतापर्यंत लॉकडाऊन चालू आहे. आणि नुकतीच पंतप्रधानांनी त्याची मुदत ३ मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्याला प्रतिबंध झाले आहे. तर अनेक सेवा बंद झाल्या आहेत. परिणामी त्यात काम करणारे कामगार, रोजच्या-रोज काम करून पोट भरणारे मजूर, धंदा-व्यवसाय करणारे व्यापारी आशा अनेकांची कमाई तूर्तास थांबली आहे. यावरून आर्थिक संकट आल्याची भीती त्वरित दाखविली जाऊ लागली आहे.ही एक बाजू काहीअंशी रास्तही आहे. मात्र दुसरी बाजू पाहता प्रत्येक माणसाचा अनेक बाबतीत होणारा दैनंदिन खर्चही सध्या काही प्रमाणात निश्चितपणे कमी झाला आहे. हे नाकरता येणार नाही. आणि त्यातच सरकारने सांगितल्या नुसार अनेक आस्थापनांनी या संकटाच्या घडीला गैरहजेरीचा देखील पगार देण्याची तयारी दाखविली आहे. सरकारने देखील आपल्या पातळीवर तीन महिन्याचे अन्नधान्य मोफत देऊ केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकांच्या उत्पन्नात घाट झाली असली तरी घरातच थांबावे लागल्याने जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर खर्चात मात्र झालेली बचत गृहीत धरता सर्वसामान्यांचे बजेट एवढ्यात कोसळेल अशी काही स्थिती दिसत नाही असे अर्थतज्ञाचे मत आहे.
लॉकडाऊनमुळे लोकांच्या फोरव्हीलर, टू व्हीलर गाड्या घराच्या पार्किंगमध्येच थांबल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची बचत झाली आहे.. हॉटेल, चायनीज, कॅफे, स्वीटमार्ट सगळेच बंद असल्याने तरुणाईकडून होणारा खर्च वाचला आहे. आठवडा बाजार, डी -मार्ट, सौंदर्यप्रसाधने, कपडे आदीची दुकाने बंद झाल्याने शॉपिंगसाठी लोकांच्या खिशातून जाणारा साप्ताहिक खर्चही बचत झाला आहे. अनेकांचा इस्त्रीची दुकाने, केश किर्तनालये, पान टपऱ्या, ब्युटीपार्लर, बिअरबर, या माध्यमातून होणाऱ्या खर्चालाही लगाम लागली आहे. तर लग्न, वाढदिवस, पार्ट्या, सण, उत्सव, तीर्थयात्रा, सहली, यावर होणार खर्चही वाचला आहे. लोकांच्या रोजच्या प्रवासाचा खर्चही बचत झाला आहे.
दुसऱ्या बाजूला सर्वच कारभार ठप्प झाल्याने हाती येणारी रोजची कमाई थांबली असली तरी या संकटाच्या काळात अनेक संस्था-संघटना, उद्योजक, सेलिब्रेटी, कलावंत सारे मदतीला धावून आले आहेत. म्हणून मजूर, गोर-गरीब, भटके, निराधार अशा कुणाचीही उपासमार होत नाही. त्याच्याच जोडीला राज्य सरकारने देखील वीज बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, इन्शुरन्स, बँक हप्ते या सगळ्याला मुदतवाढ देऊन ताणही कमी केला आहे.
हे सारं गणित पाहता आपली कमाई जरूर कमी झाली आहे. पण जीव धोक्यात असताना थोडं नुकसान सोसावं लागलं तरी त्यामानाने खर्चात घाट देखील तितकीच झाल्याने सध्या तरी आर्थिक घडी कोलमडण्याची फारशी भीती नाही असेच चित्र आहे.