पेण, दि. ११- जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी पोलाद निर्मिती करणारी कंपनी. या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा अधिक आहे. त्यातच मुंबई, नवीमुंबई, ठाणे या भागातून शेकडो बसेसमधून हजारोंच्या संख्येने कामगार रोज ये -जा करीत आहेत. एकीकडे कोरोनाच्या महाभयंकर संकटाला परतवून लावण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये प्रवसबंदी झाली. राज्यांच्या सीमा सील झाल्या. सर्व मार्गाने वाहतूक बंद झाली. साथीचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टंगसिंग पाळण्यात येऊ लागले. लोकांना घराबाहेर पडायला मज्जाव होऊ लागला.अशा संचार बंदीतही जेएसडब्ल्यू कंपनीचे उत्पादन मात्र नित्याप्रमाणेच सुरु राहिले. यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यांना संसर्गाचा धोका सतावू लागला. कारण कंपनी परिसरातील आसपासच्या गावांमध्ये हजारो कामगार खोल्या घेऊन भाड्याने राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजच्या कंपनीतील ये-जा करण्याने कोरोनाचा फ़ैलाव गावात वाढण्याची आशंका वाटू लागली. म्हणून येथील आठ-दहा ग्रामपंचायतीनी जिल्हा प्रशासनाकडे कंपनी बंद ठेवण्यात यावी अशी लेखी मागणी केली.
संचारबंदीच्या काळात अन्न उत्पादन, औषध उत्पादन व जीवनावश्यक वस्तूंच्याच उत्पादनाला परवानगी असताना या लोखंड निर्मिती करणाऱ्या कंपनीला वगळण्यात आल्याने, इतर सगळी वाहातून बंद असताना कंपनीची वाहने रस्त्यावरून धावत राहिल्याने लोकांमध्ये चर्चेला उधाण आले. काहींनी तक्रारी देखील केल्या. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही सूट देण्याला केंद्र सरकारच्या इस्पात मंत्रालयाचे सचिव बिनाय कुमार यांच्या २४ मार्च २०२० च्या आदेशाचा हवाला दिला.
प्रत्येक्षात या महामारीच्या प्रकोपाने कामगार देखील कामावर जाण्यास नाखूष आहेत. परप्रांतीय आपल्या गावाला गेले असते परंतु लॉकडाऊनमुळे ते अडचणीत सापडले आहेत. म्हणूनच त्यांना कामावर जाणे मजबुरीचे झाले. तरीही स्थानिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेऊन एका हॉटेलवर कामगारांची व्यवस्था करण्याचा वा कंपनीतच राहण्याची व्यवस्था करण्याचा पर्याय व्यवस्थापन शोधू लागला आहे.
दरम्यान कंपनी परिसरातील गावांमध्ये मात्र दवंडी पिटून कुणीही कामाला न जाण्याचे आवाहन करण्यात आल्ये आहे. गेल्यास त्याला परत गावात न येण्यास बजावण्यात आले आहे.
नुकत्याच अलिबाग येथे सर्व पक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयांनंतर आता रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी देखील पनवेलच्या पुढील कामगारांना कामावर न येता आपल्या घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. सध्या नव्या मुंबईत आणि पनवेलमध्ये वाढत्या रुग्णांची संख्या पाहता रायगडचे १४ तालुके कोरोनमुक्त आहेत. तेथे बाहेर गावाहून येणा -जाणाऱ्या कामगारांमुळे संसर्ग फ़ैलावण्याचा धोका नको. अशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उधोगमंत्री याना दिले आहे.